मुंबई : अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमानात एक वैमानिक आणि क्रू मेंबरसह १० जण महाराष्ट्राचे होते, असे एअर इंडियाच्या अधिकार्यांनी शुक्रवारी सांगितले. गुरुवारी दुपारी अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स असलेले बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान वैद्यकीय महाविद्यालच्या परिसरात कोसळले. या अपघातात एक जण बचावला, तर २४१ जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी १० जण महाराष्ट्राचे होते. विमानाचे वैमानिक सुमित पुष्कराज सभरवाल (५६) हे मुंबईतील पवई परिसरातील जल वायु विहारचे रहिवासी होते. सहवैमानिक क्लाईव्ह कुंदर हे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील रहिवासी होते. केबिन क्रू मेंबर दीपक पाठक ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे राहत होते. दुसरी क्रू मेंबर मैथिली पाटील ही नवी मुंबईतील न्हावा गावची रहिवासी होती. पाटील दोन वर्षांपूर्वी एअर इंडियामध्ये रुजू झाली होती. क्रू मेंबर अपर्णा महाडिक (४३) ही पश्चिम उपनगरातील गोरेगावची रहिवासी होती, ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांची नातेवाईक होती. रोशनी राजेंद्र सोनघरे आणि सायनीता चक्रवर्ती, दोन्ही क्रू मेंबर अनुक्रमे डोंबिवली आणि जुहू कोळीवाडा येथील रहिवासी होत्या.मृतांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील हातिद गावातील रहिवासी असलेले महादेव पवार (६८) आणि त्यांची पत्नी आशा (६०) यांचाही समावेश होता.
Fans
Followers